मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला… अमरावतीत गर्भवती सूनेशी अमानुष वागणूक; मारहाणीत गर्भपात!

    11-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सासरच्या मंडळींकडून झालेल्या अमानुष मारहाणीत गर्भवती महिलेचा गर्भपात झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पती, सासू आणि नणंद यांच्याविरोधात पथ्रोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, हुंड्यासाठी तिचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. याच वादातून सासरच्या लोकांनी तिला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर तिची प्रकृती बिघडू लागली. ती वारंवार “मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला…” अशी विनंती करत होती. मात्र तिच्या आक्रोशाकडे कुणीही लक्ष दिले नाही. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या पतीनेही तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

उपचार न मिळाल्याने अखेर तिचा गर्भपात झाला.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, अशाच प्रकारच्या कौटुंबिक छळाच्या घटना राज्यात सातत्याने समोर येत आहेत. बीड जिल्ह्यातही सासरच्या छळाला कंटाळून मुस्कान वसीम शेख या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

तसेच गेल्या वर्षी गाजलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. पती आणि सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून अवघ्या 23 वर्षीय वैष्णवीने आत्महत्या केली होती. नऊ महिन्यांच्या बाळाला मागे सोडून तिने टोकाचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई करत संबंधितांना अटक केली होती.

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे कठोर कायद्यांसोबत समाजातील मानसिकता बदलण्याची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे.