जबलपूर बोट दुर्घटना: आईने अखेरच्या श्वासापर्यंत ४ वर्षांच्या मुलाला कवेतच ठेवले; बचाव पथकही झाले भावूक

    01-May-2026
Total Views |
 
Jabalpur boat accident
 Image Source:(Internet)
 
जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूर (Jabalpur) येथे घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. नर्मदा नदीवरील बरगी धरण परिसरात क्रूझ बोट उलटल्याने ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एका आई आणि तिच्या ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू अत्यंत वेदनादायक ठरला आहे.
 
बचावकार्यादरम्यान गोताखोरांना हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. आईने आपल्या मुलाला इतक्या घट्ट कवेत घेतले होते की दोघांना वेगळे करणेही कठीण झाले. एका बचाव कर्मचाऱ्याने सांगितले की, महिलेचा मृतदेह बाहेर काढताना तो हलत नव्हता. जवळून पाहिले असता तिने मुलाला घट्ट धरून ठेवले असल्याचे दिसले आणि हे दृश्य पाहून संपूर्ण पथक सुन्न झाले.
 
मृत आई आणि मुलगा हे दिल्ली येथून फिरण्यासाठी आलेल्या कुटुंबातील होते. या अपघातात वडील आणि मुलगी बचावले, मात्र आई आणि मुलाचा मृत्यू झाला.
 
दरम्यान, या दुर्घटनेमागे निष्काळजीपणा की खराब हवामान, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार बोटीत पुरेशा लाइफ जॅकेट्स नव्हत्या आणि सुरक्षा तपासणीही नीट झाली नव्हती. काहींनी असा आरोप केला की बोट बुडू लागल्यानंतरच लाइफ जॅकेट देण्यात आल्या. मात्र प्रशासनाने अचानक आलेल्या वादळामुळे हा अपघात घडल्याचे म्हटले आहे.
 
गुरुवारी सायंकाळी सुमारे ४० ते ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी ही टुरिस्ट बोट अचानक वादळात सापडली. ताशी सुमारे ४० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसामुळे बोटीचा तोल गेला आणि ती किनाऱ्यापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर बुडाली. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि अनेकांना वाचवण्यात यश आले.
 
सध्या प्रशासन आणि बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू असून, काही प्रवासी अद्याप बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना पर्यटनस्थळांवरील सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.