
Image Source:(Internet)
गोंदिया : जिल्ह्यात रानहत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा थैमान घातले असून, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकरी अक्षरशः संकटात सापडले आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या हैदोसामुळे मका, धान आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत सुमारे ५० हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत करून उभी केलेली पिके काही क्षणांत नष्ट होत असल्याने संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, शेतकरी आता रात्रीची झोप विसरून शेतातच तळ ठोकून बसत आहेत. कडाक्याच्या थंडीत आणि अंधारात शेकोटी पेटवून ते रात्रभर पिकांची राखण करत आहेत. मात्र, रानहत्तींचा कळप अत्यंत आक्रमक असल्याने शेतकऱ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.
माहितीनुसार, हा रानहत्तींचा कळप सुमारे महिनाभरापूर्वी आंध्र प्रदेशातून गडचिरोली मार्गे गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला. वडेगाव-बांध्या परिसरात मका पिकांची मुबलकता असल्याने हत्ती येथेच ठाण मांडून बसले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सातत्याने घडत असून, दरवर्षी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वडेगाव-बांध्या परिसरात शेतात काम करत असताना हत्तींच्या कळपाने अचानक हल्ला केल्याने चार शेतकरी जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी बाधित भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी वन विभागाला तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.
वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार यांनी सांगितले की, हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने दोन विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत दिली जात आहे.
वन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत, एकट्याने शेतात किंवा जंगलाच्या दिशेने जाऊ नये, असे आवाहन केले आहे. मात्र, या वाढत्या संकटावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.