
बारामती: विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गात असलेला महत्त्वाचा अडथळा दूर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे संपूर्ण समीकरण बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
काँग्रेसकडून देण्यात आलेली उमेदवारी मागे घेण्याबाबत सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. बारामतीत आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, ही उमेदवारी मागे घेण्यासाठी पक्षांतर्गत आणि आघाडी पातळीवर चर्चांना वेग आला आहे.
या संदर्भात रोहित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. या चर्चेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही काँग्रेसने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे समजते.
दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी माध्यमांशी बोलताना संकेत दिले की, आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय पक्षाकडून घेतला जाऊ शकतो. हा निर्णय अधिकृत झाला, तर सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र, काही अपक्ष उमेदवार अद्याप मैदानात असल्याने निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
या पोटनिवडणुकीचा संदर्भ दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाशी जोडलेला आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे सहानुभूतीची लाटही सुनेत्रा पवार यांच्या बाजूने असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, उमेदवार आकाश मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, “मी सध्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या तयारीत आहे. ग्रामीण भागात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे,” असे सांगितले.
याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक शक्य असल्यास बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडल्याने काँग्रेसच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीत पुढील काही दिवसांत घडणाऱ्या राजकीय हालचाली निर्णायक ठरणार आहेत.