
Image Source:(Internet)
बारामती : विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने घेतलेल्या माघारीच्या निर्णयामुळे राजकीय चित्रच बदलले आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर महायुतीच्या सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग अधिक मोकळा झाल्याचे दिसून येत आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात होणारी ही पोटनिवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत होती. मात्र काँग्रेसच्या या निर्णयानंतर निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवा कलाटणी मिळाली आहे.
या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसचे आभार मानले. “ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची सुरुवातीपासूनच भूमिका होती. काँग्रेसने घेतलेला निर्णय हा सकारात्मक असून दादांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, “अजितदादांनी राज्याच्या विकासासाठी सर्व पक्षांना एकत्र आणत काम केले. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय स्पर्धा नसून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याची संधी आहे. सर्व पक्षांनी दाखवलेली एकजूट निश्चितच कौतुकास्पद आहे.”
दरम्यान, अजूनही काही उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही इतर उमेदवारांशी संवाद साधत आहोत. अनेकांनी त्यांच्या स्थानिक प्रश्नांबाबत मागण्या मांडल्या आहेत. जास्तीत जास्त अर्ज माघारी घ्यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे ते म्हणाले.
या निवडणुकीसाठी एकूण ५३ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ३० उमेदवारांनी माघार घेतली असून अद्याप २३ जण मैदानात आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असली, तरी महायुतीसाठी वातावरण अनुकूल बनले आहे.
“आज काँग्रेसने आम्हाला साथ दिली, त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. भविष्यात त्यांच्या पक्षासमोर अडचणी आल्यास आम्हीही त्यांना मदत करू,” असे सांगत जय पवार यांनी काँग्रेसप्रती कृतज्ञता व्यक्त केली.