अमरावतीला अधिकृत राजधानीचा दर्जा; मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे राष्ट्रपतींप्रती आभार

    08-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

अमरावती : आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट ठरलेला निर्णय जाहीर झाला असून अमरावतीला राज्याची अधिकृत राजधानी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. आंध्र प्रदेश पुनर्गठन (दुरुस्ती) अधिनियम २०२६ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्यानंतर हा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर संबंधित अधिनियम राजपत्रात प्रकाशित करण्यात आला असून, त्यानुसार अमरावतीला राजधानीचा कायदेशीर दर्जा प्राप्त झाला आहे.

मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया देत हा निर्णय राज्यातील जनतेच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर साकार झालेलं स्वप्न असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही विशेष आभार मानले.

नायडू यांनी स्पष्ट केले की, ही केवळ सरकारची कामगिरी नसून राज्यातील नागरिकांची, विशेषतः अमरावतीतील शेतकऱ्यांची मोठी जिद्द आणि योगदान यामागे आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही या निर्णयाला ऐतिहासिक म्हटले आहे. ६ एप्रिल हा दिवस आंध्र प्रदेशच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे त्यांनी नमूद केले. संसदेत विधेयक मंजूर होऊन राष्ट्रपतींची संमती मिळाल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

या निर्णयाबद्दल त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री नायडू यांचे आभार मानत, आंध्र प्रदेशच्या विकासासाठी हा मोठा टप्पा असल्याचे अधोरेखित केले.