आईसह चार मुलांना विषबाधा; तीन चिमुकल्यांचा मृत्यू, बुलढाणा हादरलं

    07-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

बुलढाणा : जिल्ह्यातील धाड येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका कुटुंबातील आईसह चार लहान मुलांना विषबाधा झाल्याने तीन चिमुकल्या बहीण-भावांचा मृत्यू झाला आहे, तर आई आणि एक मुलगी अद्याप उपचाराधीन आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय ४), मशिरा मोहंमद वसीम जमदार (वय ७) आणि फातिमा मोहंमद वसीम जमदार (वय ८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आई अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय ३४) आणि तीन वर्षांची अश्मिरा वसीम जमदार यांच्यावर बुलढाण्यातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

रविवारीपासून कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला. सोमवारी सकाळी प्रकृती गंभीर झाल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिघा चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सध्या अश्मिराची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धाड परिसरात शोककळा पसरली आहे.