
Image Source:(Internet)
ठाणे : राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहंग समूहाने भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना वकिलामार्फत नोटीस पाठवत, कंपनीविरोधात होत असलेल्या कथित खोट्या आणि बदनामीकारक वक्तव्यांवर आक्षेप नोंदवला आहे. अशा विधानांना तात्काळ विराम द्यावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नोटीसमध्ये मेहता यांचे आरोप राजकीय हेतूंनी प्रेरित असून, विकासकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी केलेल्या विधानांमुळे कंपनीची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा विहंग समूहाने केला आहे.
घोडबंदर परिसरातील भाईंदरपाडा येथे जमीन वादातून हा संपूर्ण वाद उफाळून आला. संबंधित भूखंडावर हक्क असल्याचा दावा करत स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन छेडले. विहंग समूहाकडून जबरदस्ती ताबा घेतला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंमध्ये तणाव वाढून झटापट झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
घटनेनंतर आमदार नरेंद्र मेहता यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि विहंग समूहाच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन बळकावल्याचे गंभीर आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ठाणे महापालिकेतही केली होती.
दरम्यान, विहंग समूहाने नोटीसमध्ये नमूद केले आहे की, कोणतीही अधिकृत कागदपत्रे किंवा नोंदी तपासल्याशिवाय सार्वजनिक आरोप करून जनमत भडकवले जात आहे. त्यामुळे असे आरोप मागे घ्यावेत आणि पुढे अशा प्रकारची विधाने टाळावीत, अशी मागणी कंपनीने केली आहे.
नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर दिवाणी आणि फौजदारी कारवाईचा मार्ग स्वीकारला जाईल, असा स्पष्ट इशाराही विहंग समूहाने दिला आहे.