राज्यात उष्णतेचा कहर; १० दिवसांत १५ मृत्यू, उष्माघाताचा वाढता धोका

    29-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्यभर उष्णतेची तीव्र लाट उसळली असून अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि काही पश्चिम महाराष्ट्रातील भागांत तापमानाने उच्चांक गाठला असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात गेल्या दहा दिवसांत उष्माघातामुळे १५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सतत वाढणाऱ्या तापमानामुळे उष्णतेशी संबंधित आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शरीरातील पाण्याची कमतरता ही सर्वात मोठी समस्या ठरत असून त्यामुळे थकवा, अशक्तपणा, मळमळ, उलट्या आणि भूक मंदावणे यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत. काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांना गोंधळल्यासारखे वाटणे, स्नायूंमध्ये आकडी येणे आणि शुद्ध हरपणे अशी लक्षणेही दिसून येत आहेत.

उष्णतेचा परिणाम केवळ आरोग्यावरच नव्हे, तर त्वचेवरही होत आहे. वाढत्या घामामुळे अंगावर पुरळ, खाज आणि फोड येण्याचे प्रमाण वाढले आहे. तज्ज्ञांच्या मते, या स्थितीत शरीरातील पाण्यासोबतच क्षारांचीही कमतरता भरून काढणे आवश्यक असून ‘ओआरएस’सारख्या द्रावणाचा वापर करणे उपयुक्त ठरते.

दरम्यान, विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर येथे तापमान ४४ ते ४५ अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. गेल्या काही तासांत तापमानात किंचित घट झाली असली तरी उष्णतेची तीव्रता कायम असल्याने नागरिकांचे हाल सुरूच आहेत.

प्रशासन आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळण्याचा, हलक्या रंगाचे सुती कपडे वापरण्याचा आणि पुरेशा प्रमाणात पाणी व द्रवपदार्थ घेण्याचा सल्ला दिला आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांनी त्रस्त रुग्णांनी औषधे वेळेवर घेणे अत्यावश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.

उष्णतेच्या या वाढत्या संकटामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.