नागपूर : शहरातील कोराडी परिसरातील सेवानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर ३० एप्रिल ते ४ मे दरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी चषक” या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून, नागपूर कबड्डीच्या थरारासाठी सज्ज झाले आहे.
या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पत्रकार परिषदेत नियोजनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. राज्यभरातील नामांकित आणि आघाडीचे कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने स्पर्धेची रंगत अधिक वाढणार आहे.
खेळाडू व प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यावर आयोजकांचा भर असून, क्रीडांगणावर आधुनिक व्यवस्था, आसनव्यवस्था, सुरक्षेची काटेकोर योजना आणि इतर आवश्यक सुविधा उभारण्यात येत आहेत.
या स्पर्धेमुळे नागपूरमध्ये कबड्डी खेळाला नवी ऊर्जा मिळणार असून, स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.