उन्हाळी सुटीतच शिक्षकांना प्रशिक्षणाचा बोजा; नव्या अभ्यासक्रमामुळे सुटीवर परिणाम

    18-Apr-2026
Total Views |
 
Teachers
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यात सन २०२५-२६ पासून नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाची अंमलबजावणी हळूहळू सुरू होत असून, त्याअंतर्गत इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांसाठी (Teachers) विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आला आहे. मात्र, हे प्रशिक्षण थेट उन्हाळी सुटीत आयोजित करण्यात आल्याने शिक्षकांच्या विश्रांतीवर परिणाम होत असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात रंगू लागली आहे.
 
शैक्षणिक वर्ष १५ जून २०२६ पासून सुरू होणार असल्यामुळे त्यापूर्वी सर्व संबंधित शिक्षकांना प्रशिक्षण देणे अनिवार्य असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका अशा तीन स्तरांवर प्रशिक्षणाची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. मराठी तसेच इतर माध्यमांसाठी तीनही स्तरांवर प्रशिक्षण होणार असून, उर्दू माध्यमातील शिक्षकांना राज्य व जिल्हास्तरावरच मार्गदर्शन दिले जाणार आहे.
 
प्रशिक्षण कालावधीसंदर्भातही स्पष्ट वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दुसरीसाठी तीन दिवस, तर तिसरी आणि चौथीसाठी प्रत्येकी चार दिवसांचे सत्र निश्चित करण्यात आले आहे. राज्यस्तरावरील प्रशिक्षण ४ ते ७ मे दरम्यान, जिल्हास्तरावर ११ ते १४ मे आणि तालुकास्तरावर १८ ते ३० मे या कालावधीत पार पडणार आहे.
 
प्रशिक्षणासाठी लागणारे अभ्यासक्रम साहित्य शाळांपर्यंत पोहोचविले जाणार असून, प्रशिक्षणाला उपस्थित राहताना ते साहित्य सोबत आणणे बंधनकारक असेल. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. प्रत्येक ६० शिक्षकांचा स्वतंत्र गट तयार करून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 
दरम्यान, शिक्षकांवर जनगणना, मतदार यादी अद्ययावत करणे अशा शासकीय जबाबदाऱ्याही येत असल्याने प्रशिक्षणाचे नियोजन टप्प्याटप्प्याने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व शिक्षकांनी नियोजित वेळेत प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.