विधान परिषद निवडणूक : ‘लॉटरी’ कोणाच्या वाट्याला? महायुतीचा अतिरिक्त उमेदवार ठरवू शकतो रंगत

    18-Apr-2026
Total Views |
 
Legislative Council Election
 Image Source:(Internet)
मुंबई :
विधानसभेच्या माध्यमातून विधान परिषदेत (Legislative Council) पाठवायच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार असून, सध्या ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सत्ताधारी महायुतीने अपेक्षेपेक्षा एक उमेदवार जास्त उभा केला, तर सामना चुरशीचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला. २०२० मध्ये याच ९ जागांची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्या वेळी भाजपला ४, एकत्रित शिवसेनेला २, एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला २ आणि काँग्रेसला १ जागा मिळाली होती. या निवडणुकीत विधानसभेतील आमदार हेच मतदार असतात.
 
यंदा मात्र राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली दिसत आहेत. महायुतीकडे तब्बल २३५ आमदारांचे संख्याबळ असल्यामुळे ९ पैकी ८ जागा सहज जिंकण्याची त्यांची स्थिती आहे. भाजपने सहावा उमेदवार रिंगणात उतरवला, तर निवडणुकीत रंगत निर्माण होऊ शकते. परंतु सध्याच्या घडीला ती शक्यता कमी मानली जात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळून केवळ एकच जागा मिळण्याची गणिते आहेत.
 
उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार का?
२०२० मध्ये विधान परिषदेत प्रवेश केलेल्या उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे. त्यामुळे ते पुन्हा विधान परिषदेत जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षांतर्गत पातळीवर त्यांनी पुन्हा आमदार व्हावे, अशी मागणी असल्याचे बोलले जात आहे. पक्ष संघटनेत संतुलन राखण्यासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचा सूर आहे. ते निवडणुकीत उतरले, तर निवडणूक बिनविरोध ठेवण्याकडे सत्ताधाऱ्यांचाही कल राहू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
 
यापूर्वी राज्यसभा निवडणुकीत Sharad Pawar यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा दिल्याने ती निवडणूक बिनविरोध झाली होती, याचीही आठवण करून दिली जात आहे.
 
निवृत्त होणारे सदस्य या निवडणुकीनंतर काही विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, दादाराव केचे, संदीप जोशी, संजय केणेकर, अमोल मिटकरी आणि राजेश राठोड यांचा समावेश आहे.
 
निवडणूक कार्यक्रम असा
अधिसूचना जाहीर : २३ एप्रिल
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : ३० एप्रिल
अर्जांची छाननी : २ मे
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : ४ मे
मतदान : १२ मे (सकाळी ९ ते दुपारी ४)
मतमोजणी : सायंकाळी ५
 
दरम्यान, सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता २०२० प्रमाणेच ही निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठीही पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.