Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
देशात एलपीजीच्या (LPG) पुरवठ्याबाबत चर्चा सुरू असतानाच आता सोने आणि चांदीच्या उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयात प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे येत्या काळात या मौल्यवान धातूंचा तुटवडा जाणवू शकतो आणि त्याचा थेट परिणाम दरांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय बँकांनी सध्या परदेशातून सोने-चांदी आयात करण्याच्या नव्या ऑर्डर्स थांबवल्या आहेत. यामागील प्रमुख कारण म्हणजे आयातीसाठी आवश्यक असलेल्या अधिकृत परवानग्यांबाबत सरकारकडून अद्याप स्पष्ट आदेश जारी झालेला नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी सीमाशुल्क मंजुरीअभावी कस्टम विभागाकडे अडकून पडले आहे.
व्यापार क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक टन सोने आणि सुमारे ८ टन चांदी सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. नवीन आयात ठप्प झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आणि चांदीचा सर्वात मोठा खरेदीदार असल्याने, देशाची मागणी मोठ्या प्रमाणात आयातीवरच अवलंबून आहे.
या परिस्थितीचा जागतिक बाजारावरही परिणाम होऊ शकतो. भारतातील मागणी कमी झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर दरात चढ-उतार दिसू शकतात. दुसरीकडे, आयात घटल्याने देशाची व्यापार तूट काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते आणि रुपयावरचा दबावही कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, Directorate General of Foreign Trade (DGFT) कडून दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सोने-चांदी आयातीसाठी अधिकृत बँकांची यादी जाहीर केली जाते. मात्र, यंदा एप्रिल महिना अर्धा उलटूनही अद्याप कोणतेही नवे मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे बँका आणि व्यापारी सध्या अनिश्चिततेत आहेत.
सूत्रांच्या मते, मुंबईतील एका बँकेकडे ५ टनांहून अधिक सोने मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकले आहे. DGFT कडून आदेश कधी येईल, याबाबत स्पष्टता नसल्याने बँकांनी नव्या आयातीचे व्यवहार थांबवले आहेत.
दरम्यान, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल च्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये भारताची सोन्याची मागणी ७१०.९ मेट्रिक टनांवर घसरली असून, गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात नीचांकी पातळी ठरली आहे. त्यामुळे आधीच कमी झालेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आता पुरवठ्याच्या अडचणी निर्माण झाल्यास बाजारातील अस्थिरता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.