महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही;मुख्यमंत्री फडणवीसांनी इंधन टंचाईच्या अफवा फेटाळल्या!

    09-Mar-2026
Total Views |
 
Petrol and Diesel
 Image Source:(Internet)
नागपूर:
इराण-इस्रायल-अमेरिका दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात इंधन टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा पसरत होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांनी या अफवांना पूर्णविराम देत राज्यात पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.
 
गेल्या काही दिवसांपासून काही माध्यमे आणि सोशल मीडियावर युद्धाच्या जागतिक परिणामामुळे महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये इंधनाची कमतरता भासू शकते, अशा बातम्या प्रसारित होत होत्या. या पार्श्वभूमीवर पुणे आणि इतर मोठ्या शहरांमधील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
 
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवून अनावश्यक भीती निर्माण करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास पूर्णपणे सक्षम आहे. देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलली आहेत.”
 
दरम्यान, इंधन पुरवठ्याबाबत सरकारने दिलासा दिला असला तरी घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात एकाच वेळी 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर व्यावसायिक सिलेंडरचे दर 150 ते 200 रुपयांनी वाढल्याने हॉटेल व्यवसायिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
 
याशिवाय काही भागांमध्ये गॅस सिलेंडर वितरणावर दिवसांची मर्यादा (कॅप) घालण्यात आल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत, त्यामुळे अनेकांना वेळेवर सिलेंडर मिळण्यात अडचणी येत आहेत.