Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक (T20 World Cup) २०२६ च्या अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत न्यूझीलंडवर ९६ धावांनी मोठा विजय मिळवला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या या लढतीत भारताने सर्वच विभागांत प्रभावी खेळ दाखवत सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. यासह स्पर्धेच्या सलग दोन आवृत्त्या जिंकणारा भारत पहिला संघ ठरला.
सामन्यात प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या भारताने २० षटकांत ५ गडी गमावत २५५ धावांची भक्कम मजल मारली. भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.
संघाच्या मोठ्या धावसंख्येत संजू सॅमसन यांचे सर्वाधिक योगदान ठरले. त्यांनी अवघ्या ४६ चेंडूत ८९ धावांची धडाकेबाज खेळी करत मैदानात चौकार-षटकारांचा वर्षाव केला. त्यांना अभिषेक शर्मा यांनी २१ चेंडूत ५२ धावा करून चांगली साथ दिली. तसेच ईशान किशन यांनी २५ चेंडूत ५४ धावांची झपाट्याची खेळी साकारत संघाची धावगती वाढवली. या फलंदाजांच्या भागीदारीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली.
डावाच्या अखेरीस हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनीही आक्रमक फटके खेळत धावसंख्या २५५ पर्यंत पोहोचवली.
२२५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसला. भारतीय गोलंदाजांनी अचूक आणि कडक मारा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे न्यूझीलंडची फलंदाजी ढासळली.
नियमित अंतराने गडी बाद होत गेल्याने न्यूझीलंडला मोठी भागीदारी उभारता आली नाही. अखेर संपूर्ण संघ १५९ धावांवर बाद झाला आणि भारताने ९६ धावांनी शानदार विजय मिळवला.
या विजयासह भारताने टी-२० विश्वचषकाचे तिसरे विजेतेपद मिळवत क्रिकेट इतिहासात नवा अध्याय लिहिला. देशभरात चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा करत संघावर अभिनंदनाचा वर्षाव केला