बीड जिल्ह्यातील धक्कादायक रॅकेट उघड;लग्नाचे आमिष दाखवून महिलांची विक्री

    09-Mar-2026
Total Views |
 
racket exposed
 Image Source:(Internet)
बीड :
लग्नाचे आमिष दाखवून महिलांची (Women) तस्करी करणाऱ्या एका गंभीर रॅकेटचा पर्दाफाश बीड जिल्ह्यात झाला आहे. सततच्या छळाला कंटाळून एका २१ वर्षीय महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली असून या रॅकेटचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी तिचे बीड जिल्ह्यात लग्न झाले होते. मात्र पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि ती माहेरी परतली. त्यानंतर काही काळात तिच्या आजी-आजोबांचेही निधन झाले, त्यामुळे ती आर्थिक व सामाजिकदृष्ट्या असुरक्षित झाली.
 
याच परिस्थितीचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तिला दुसरे लग्न करून देण्याचे आश्वासन दिले. या बहाण्याने तिला पुण्यात नेण्यात आले. तेथे महानंदा नावाच्या एका महिला दलालाशी तिची ओळख करून देण्यात आली. पैशाच्या लालसेपोटी या एजंटने तिची वेगवेगळ्या ठिकाणी लग्ने लावून तिला विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम तिचे लग्न पुण्यातील कात्रज परिसरातील एका व्यक्तीसोबत सुमारे पाच लाख रुपयांत ठरवण्यात आले. ती तेथे साधारण दहा दिवस राहिली. त्यानंतर तिला हरियाणातील कुरुक्षेत्र येथे दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवण्यात आले. तेथे सुमारे साडेचार लाख रुपयांत दुसरे लग्न लावण्यात आले, मात्र ती तेथे केवळ पाच दिवसच राहिली.
 
अशाप्रकारे तिची वारंवार विक्री होत असल्याचा आरोप असून या संपूर्ण प्रकरणाने महिलांच्या तस्करीचा गंभीर मुद्दा पुन्हा समोर आला आहे. सध्या पोलिसांकडून या रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोध घेण्यात येत असून तपास सुरू आहे.