मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र; बच्चू कडू यांचा शासनाला इशारा

    09-Mar-2026
Total Views |
 
Bachchu Kadu
 Image Source:(Internet)
अमरावती :
जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिला. शांततामय मार्गाने सुरू असलेला आंदोलनाचा टप्पा आता संपला असून शासनाने दखल घेतली नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी चेतावणी त्यांनी दिली.
 
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की जिल्हास्तरावर काही प्रश्न मार्गी लागले असले तरी राज्य शासनाच्या पातळीवरील अनेक महत्त्वाचे मुद्दे अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासनाने दुपारी चार वाजेपर्यंत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अधिक कठोर करण्यात येईल, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
 
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही आंदोलनकर्त्यांनी टीका केली. आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शासन या प्रश्नांबाबत गंभीर नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक समस्या दीर्घकाळ प्रलंबित असून त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
 
दरम्यान, राज्यातील वाळू धोरणाबाबतही आंदोलनकर्त्यांनी आक्षेप नोंदवला. मध्य प्रदेशातून येणाऱ्या वाळूवर रॉयल्टी आकारली जात नाही, मात्र महाराष्ट्रातील वाळूवर रॉयल्टी आकारली जाते, हा अन्यायकारक प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला.
 
आदिवासी मतदारांनी मोठ्या मताधिक्याने आमदार निवडून दिला असून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.