Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सिलिंडर बुकिंग प्रक्रियेत बदल करत काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांनुसार, आता ग्राहकांना मागील सिलिंडरच्या डिलिव्हरीनंतर किमान २१ दिवस पूर्ण झाल्यानंतरच पुढील सिलिंडरचे बुकिंग करता येणार आहे.
यापूर्वी हा कालावधी सुमारे १५ दिवसांचा होता. मात्र आता तेल कंपन्यांनी त्यांच्या संगणकीय प्रणालीमध्ये बदल केल्यामुळे २१ दिवस पूर्ण होण्यापूर्वी ऑनलाइन बुकिंग करणे शक्य होणार नाही. हे नवे नियम शुक्रवारपासून लागू करण्यात आले असून सर्व गॅस वितरकांना त्याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, गॅस सिलिंडरच्या वितरणावेळी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) देणेही अनिवार्य करण्यात आले आहे. ग्राहकांनी गॅस बुक केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपीसारखा एक कोड पाठवला जातो. सिलिंडर घरी आणल्यानंतर हा कोड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला सांगितल्यानंतरच सिलिंडर ग्राहकांच्या नावावर सुपूर्द केला जाईल.
नवीन व्यवस्थेनुसार एलपीजी ग्राहकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया देखील बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच, शेवटच्या डिलिव्हरीनंतर २१ दिवस पूर्ण झाल्यानंतरच ग्राहकांना ऑनलाइन किंवा इतर माध्यमातून पुढील बुकिंग करता येईल.
दरम्यान, सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅसचा पुरवठा संतुलित राहावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले असून सर्व इंधनांचा पुरवठा नियमितपणे सुरू असल्याचेही स्पष्ट केले आहे.
तसेच, घरगुती वापरासाठी दिल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरचा व्यावसायिक वापर करू नये, असे आवाहनही कंपन्यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करून सिलिंडरचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.