नागपूर महानगरपालिकेला नवे आयुक्त; डॉ. विपिन इटनकर यांनी स्वीकारली जबाबदारी

    09-Mar-2026
Total Views |
 
Dr Vipin Itankar
 
नागपूर :
नागपूर (Nagpur) महानगरपालिकेच्या आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सोमवारी अधिकृतरित्या पदभार स्वीकारला. महानगरपालिकेच्या मुख्यालयातील छत्रपती शिवाजी प्रशासकीय इमारत येथे पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम पार पडला.
 
पदभार स्वीकारल्यानंतर अतिरिक्त आयुक्त वासुमना पंत आणि वैष्णवी बी. यांनी डॉ. इटनकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यापूर्वी आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. अभिजित चौधरी यांची बदली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदी झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. इटनकर यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
 
डॉ. इटनकर हे २०१४ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातून एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. सेवेत असताना त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते नागपूरचे जिल्हाधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारीही सांभाळत आहेत.
 
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या विविध विभागांना भेट देत कामकाजाची माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त, मुख्य अभियंता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच इतर विभागप्रमुखांसोबत शहरातील सुरू असलेल्या विकासकामांचा आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
 
नवीन आयुक्तांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरी सुविधा अधिक प्रभावी करणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि प्रशासन अधिक गतिमान करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.