
नागपूर:
मुख्यमंत्री फडणवीस (CM Fadnavis) यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध योजनांना लाडकी बहीण योजनेशी जोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. या माध्यमातून महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मुंबईतील भायंदर येथे आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी ही घोषणा केली. ग्रामीण भागातील महिलांमध्ये नेतृत्व क्षमता वाढवणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महिलांना नोकरी आणि व्यवसायाच्या अधिक संधी मिळाल्या तर देशाचा विकास अधिक वेगाने होतो. त्यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी राज्य सरकार अधिक संधी निर्माण करण्यावर भर देत आहे.
नव्या योजनेनुसार महिलांना मुंबई बँकेमार्फत कोणतीही हमी न देता आणि व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत महिलांना या कर्जाची परतफेड करण्यासही उपयोगी ठरणार आहे.
ही योजना ‘उमेद’ योजनेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. तसेच महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ सुरू करण्याचाही सरकारचा मानस आहे. या मॉलमध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री केली जाईल.
महिलांची आर्थिक शिस्तही चांगली असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, अनेक शासकीय कर्ज योजनांमध्ये सुमारे ५० टक्के कर्जाचीच परतफेड होते. मात्र महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाची परतफेड ९९ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे महिलांवर विश्वास ठेवून त्यांना अधिक आर्थिक संधी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.