भारतीय औषधं अधिक प्रभावी;अमेरिकन तरुणाकडून भारतीय आरोग्य व्यवस्थेचं कौतुक!

    09-Mar-2026
Total Views |
 
Indian medicines
 Image Source:(Internet)
ऋषिकेश :
भारतातील आरोग्य व्यवस्थेबाबत (Indian healthcare system) अनेकदा पाश्चात्य देशांशी तुलना केली जाते. मात्र, एका अमेरिकन तरुणाने भारतातील औषधं आणि उपचार पद्धतीचं मनापासून कौतुक करत भारतीय आरोग्य व्यवस्थेची प्रशंसा केली आहे.
 
अमेरिकन कंटेंट क्रिएटर चार्ली इव्हान्स सध्या भारतात प्रवास करत असून तो सध्या ऋषिकेश येथे आहे. राजस्थानमध्ये प्रवास करत असताना तो अचानक आजारी पडला. त्याला घशाचा संसर्ग झाला होता. त्यासाठी तो दोन वेळा रुग्णालयात गेला, मात्र त्याला विशेष आराम मिळाला नाही. त्यानंतर त्याने आयुर्वेदिक योगी कंठिका गोळ्या घेतल्या आणि काही तासांतच त्याला बरे वाटल्याचा अनुभव त्याने सांगितला.
 
चार्ली इव्हान्सने आपल्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितले की, भारतात आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांचा उत्तम संगम पाहायला मिळतो. येथील डॉक्टर रुग्णांशी नम्रतेने संवाद साधतात आणि उपचार प्रक्रिया देखील तुलनेने सोपी आहे. रुग्णालयात दाखल होण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत नाही, असेही त्याने नमूद केले.
 
त्याच्या मते, भारतात डॉक्टरांकडून बहुतेक वेळा जेनेरिक औषधं दिली जातात. ही औषधं सहजपणे औषध दुकानांमध्ये उपलब्ध असतात आणि त्यांची किंमतही परवडणारी असते. विशेष म्हणजे काही वेळा एक-दोन डोसमध्येच आराम मिळतो, असा अनुभवही त्याने व्यक्त केला.
 
चार्ली इव्हान्सने हा अनुभव आपल्या charlietravelusa या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले असून अनेकांनी प्रतिक्रिया देत भारतीय आरोग्य व्यवस्थेचे कौतुक केले आहे.
 
युरोप आणि अमेरिकेत भारतापेक्षा अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत, असा अनेकांमध्ये असलेला समज या व्हिडिओमुळे काही प्रमाणात चुकीचा ठरत असल्याचेही अनेकांनी नमूद केले आहे.