Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) २०२५ चा अंतिम निकाल आज (६ मार्च) जाहीर केला. या प्रतिष्ठित परीक्षेत अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावत यंदाच्या निकालात बाजी मारली आहे. त्यांच्या पाठोपाठ राजेश्वरी सुवे एम यांनी दुसरे, तर आकांश धुल यांनी तिसरे स्थान मिळवले आहे.
यावर्षीच्या टॉप-१० यादीत राघव झुनझुनवाला, ईशान भटनागर, झीनिया अरोरा, ए.आर. राजा मोहद्दीन, पक्षल सेक्रेटरी, आस्था जैन आणि उज्ज्वल प्रियंक यांचाही समावेश झाला आहे.
UPSC ने दिलेल्या माहितीनुसार, यंदा एकूण ९५८ उमेदवार नागरी सेवा परीक्षेत यशस्वी ठरले असून विविध केंद्रीय सेवांसाठी त्यांच्या नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. यापैकी ३४८ उमेदवारांची उमेदवारी तात्पुरत्या स्वरूपात स्वीकारण्यात आली आहे.
तीन टप्प्यांत पार पडली परीक्षा-
नागरी सेवा परीक्षेची प्राथमिक परीक्षा २५ मे २०२५ रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर मुख्य परीक्षा २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान झाली. अंतिम टप्प्यातील व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) प्रक्रिया ५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडली.
मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २,७३६ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. सर्व मुलाखती पूर्ण झाल्यानंतर आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला. निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत उमेदवारांचे गुण UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
विविध सेवांसाठी उमेदवारांची निवड-
आयोगाच्या माहितीनुसार, यंदा ९५८ पदांसाठी निवड करण्यात आली असून त्यामध्ये –
१८० उमेदवार – भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)
५५ उमेदवार – भारतीय परराष्ट्र सेवा (IFS)
१५० उमेदवार – भारतीय पोलिस सेवा (IPS)
याशिवाय इतर केंद्रीय सेवांसाठीही उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
IAS पदांसाठी आरक्षणाचे वितरण-
१८० आयएएस पदांपैकी –
७४ पदे अनारक्षित
२८ पदे अनुसूचित जाती
१३ पदे अनुसूचित जमाती
४७ पदे ओबीसी
१८ पदे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)
दरवर्षी UPSC मार्फत नागरी सेवा परीक्षा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. या प्रक्रियेतून IAS, IPS, IFS यांसह विविध केंद्रीय सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड केली जाते.