Image Source:(Internet)
मुंबई :
राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा ताळेबंद नसून २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र (Maharashtra) घडविण्यासाठी तयार केलेला दूरदृष्टीपूर्ण आराखडा असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केली.
मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, महिला, युवक, उद्योग क्षेत्र तसेच ग्रामीण आणि शहरी भागांच्या विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेचा सुरू ठेवलेला निर्णय राज्यातील शेतकरी आणि महिलांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर मदत देण्याचा निर्णयही शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला असून ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील वाढत्या गरजांकडेही लक्ष देण्यात आले आहे. २०४७ पर्यंत राज्यातील सुमारे ७० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहणार असल्याचा अंदाज लक्षात घेऊन राज्यात दहा ठिकाणी नागरी विकास प्राधिकरणे स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच हजार लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रमही हाती घेतला जाणार आहे.
याशिवाय समाजसुधारकांच्या कार्याची आठवण म्हणून येणारे वर्ष “सामाजिक समता व समरसता वर्ष” म्हणून साजरे करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संसदीय कार्याच्या स्मरणार्थ “गतिमान नागरी सेवा पुरस्कार” सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
पायाभूत सुविधा, उद्योगवाढ, रोजगारनिर्मिती, शेती व ग्रामविकास, ऊर्जा क्षेत्र, विमानतळे, रस्ते, मेट्रो आणि रेल्वे प्रकल्प, प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यटनविकास, परवडणारी घरे, ‘तिसरी मुंबई’ तसेच रामटेक परिसरात तिसरी चित्रपट नगरी उभारण्याच्या प्रस्तावामुळे हा अर्थसंकल्प लोकाभिमुख आणि विकासाभिमुख असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प राज्याच्या प्रगतीला नवी गती देईल आणि नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वासही मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.