Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच राज्य सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. नागपूर मनपाचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. अभिजीत चौधरी (Dr Abhijeet Chaudhari) यांची बदली करण्यात आली असून त्यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, डॉ. विपिन इटनकर यांना नागपूर मनपाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, डॉ. चौधरी हे पीएमआरडीएचे विद्यमान आयुक्त योगेश म्हसे यांची जागा घेणार आहेत. नव्या आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे मनपाचे कामकाज अतिरिक्त स्वरूपात राहणार आहे.
२०११ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले डॉ. चौधरी यांची २०२३ साली नागपूर मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्यकाळात सुमारे तीन वर्षे मनपाचे प्रशासकीय नेतृत्व त्यांनी सांभाळले. प्रशासक म्हणून काम करताना शहरातील मूलभूत सोयी-सुविधा, विशेषतः स्वच्छता व्यवस्थेबाबत विविध स्तरांतून टीका झाली. विरोधकांसह काही नागरिक संघटनांनी मनपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
तथापि, शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा, पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देणे आणि विविध विकास योजनांची अंमलबजावणी यांसाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचेही सांगितले जाते. विविध विभागांमधील समन्वय वाढवून प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात दिसून आला. नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुका देखील त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या असून त्या प्रशासकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.