जगावर पुन्हा कोरोनाचे सावट; ‘सिकाडा’ BA.3.2 व्हेरिएंटने वाढवली चिंता

    27-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : कोविड-१९चा प्रभाव कमी होत असल्याचे वाटत असतानाच BA.3.2 या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगभर धास्ती निर्माण केली आहे. ‘सिकाडा’ या नावाने ओळखला जाणारा हा प्रकार अमेरिकेसह सुमारे २२ देशांमध्ये आढळून आला असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

हा व्हेरिएंट ओमिक्रॉन कुटुंबातील उपप्रकार असला तरी सध्या प्रचलित असलेल्या प्रकारांपेक्षा वेगळा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. BA.3 हा प्रकार २०२२ नंतर फारसा दिसला नव्हता, मात्र दीर्घकाळ शांत राहिल्यानंतर तो पुन्हा सक्रिय झाल्यामुळे त्याला ‘सिकाडा’ असे नाव देण्यात आले आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, टेक्सास, फ्लोरिडा, न्यू जर्सी, वॉशिंग्टन आणि मिशिगन या राज्यांसह अनेक भागांमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय युरोपातील काही देशांमध्येही या प्रकाराचे अस्तित्व नोंदवले गेले आहे.

या व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणावर म्युटेशन झाल्याने तो अधिक वेगाने पसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच या बदलांमुळे लसींचा प्रभाव किंवा नैसर्गिक प्रतिकारशक्ती काही प्रमाणात कमी होऊ शकते, अशीही भीती व्यक्त होत आहे. सध्या तो मोठा धोका नसल्याचे सांगितले जात असले तरी त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

लक्षणांमध्ये घशात तीव्र खवखव हे एक प्रमुख लक्षण असून त्यासोबत खोकला, ताप, सर्दी, वास-चव कमी होणे, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्या यांचा समावेश आहे. काही गंभीर रुग्णांमध्ये श्वसनाचा त्रासही होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आणि आवश्यक आरोग्य नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.