इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा दिलासा; पेट्रोलवरील करात मोठी कपात, डिझेलवरील एक्साईज शून्यावर

    27-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींचा परिणाम देशांतर्गत इंधन क्षेत्रावर जाणवू लागला आहे. या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीत लक्षणीय कपात जाहीर केली आहे.

सरकारने पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी 13 रुपयांवरून थेट 3 रुपयांपर्यंत कमी केली असून डिझेलवरील एक्साईज ड्युटी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तेल विपणन कंपन्यांवरील आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने कंपन्यांना मोठा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत होता.

मात्र, या करकपातीचा थेट फायदा सर्वसामान्य ग्राहकांना तात्काळ मिळेलच असे चित्र नाही. कारण राज्य सरकारांकडून आकारला जाणारा व्हॅट अद्याप कायम आहे. त्यामुळे किरकोळ दरात त्वरित घट होण्याची शक्यता कमी असल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर अजूनही उच्च पातळीवर कायम आहेत. मुंबईत पेट्रोल 103.54 रुपये तर डिझेल 90.03 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. दिल्लीत पेट्रोल 94.77 रुपये आणि डिझेल 87.67 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल सुमारे 101 रुपयांच्या घरात असून डिझेल 92 रुपयांच्या आसपास आहे, तर लखनऊमध्ये पेट्रोल 94 रुपयांच्या पुढे आणि डिझेल 88 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे.

या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील ‘नायरा एनर्जी’ कंपनीनेही अलीकडे पेट्रोलमध्ये 5 रुपये आणि डिझेलमध्ये 3 रुपयांची वाढ केली आहे. वाढता खर्च आणि पुरेशा सरकारी मदतीचा अभाव यामुळे दरवाढ अपरिहार्य ठरल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. देशभरात या कंपनीचे सुमारे 6,900 हून अधिक पेट्रोल पंप कार्यरत आहेत.

दरम्यान, काही शहरांमध्ये इंधन तुटवड्याच्या भीतीने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात साठेबाजी होत असल्याचे चित्र दिसून आले. यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, केंद्र सरकारने देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.