Image Source:(Internet)
नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर लांब सुट्ट्या असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचे नियोजन करताना देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून एका तरुण भाविकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही सुरक्षा रक्षक संबंधित भाविकाला लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, वाद वाढल्यानंतर संबंधित तरुणाचे कपडे फाडण्यात आले आणि त्याला जमिनीवर पाडून मारहाण करण्यात आली. हा प्रकार पाहून मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या इतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेकांनी ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित भाविक दर्शन रांगेत उभा राहून जप करत होता. गर्दी वाढत असल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पुढे सरकण्यास सांगितले. मात्र, त्याने जागा सोडण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले, अशी माहिती समोर येत आहे.
या घटनेची दखल त्र्यंबकेश्वर पोलीस यांनी घेतली असून प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी भाविकांकडून केली जात आहे.