विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’

    14-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्यात सध्या हवामानात मोठा बदल दिसून येत असून एका बाजूला तीव्र उष्णता तर दुसऱ्या बाजूला ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर India Meteorological Department कडून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराच्या दिशेने येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मराठवाड्यात धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतही विजांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या काही भागांतही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गहू आणि हरभरा ही पिके काढणीच्या टप्प्यावर असताना पावसामुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आंबा, द्राक्षे आणि संत्रा बागांनाही या वादळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे ज्या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्या भागांत दिवसभर तापमान ३९ ते ४१ अंश सेल्सियसदरम्यान नोंदवले जात आहे. हवामानातील या अचानक बदलांमुळे दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळी पावसाची शक्यता निर्माण होत असून सर्दी, ताप आणि खोकल्यासारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.