काँग्रेसकडून अफवा पसरवण्याचे काम,देशात गॅसचा कोणताही तुटवडा नाही;मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

    14-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

चंद्रपूर : देशभरात घरगुती गॅसच्या पुरवठ्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक गॅस एजन्सीसमोर रांगा लावत असल्याचे दिसत आहे. मात्र देशात गॅसचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. काही राजकीय पक्ष, विशेषतः काँग्रेस नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण करण्यासाठी चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकार, पेट्रोलियम मंत्रालय आणि गॅस कंपन्यांनी देशात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांना आवश्यक तेवढे सिलेंडर उपलब्ध होत असून पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही.
अफवांमुळे काही ठिकाणी नागरिक गॅस एजन्सीसमोर अनावश्यक गर्दी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून रांगा लावण्याची गरज नसून ऑनलाईन बुकिंगसारख्या सुविधांचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

विरोधकांवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, खोटी माहिती पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करणे देशहिताचे नाही. त्यामुळे अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवून अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.