नागपुरात घरफोडी व दुचाकी चोरीचा उलगडा; गुन्हेशाखा युनिट ५ ची कारवाई

    14-Mar-2026
Total Views |
दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या दोन घटनांचा गुन्हेशाखा युनिट क्र. ५ ने छडा लावला आहे. या प्रकरणात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

माहितीनुसार, विनायक नगर परिसरातील गजानन मंदिरामागे असलेल्या म्हाळगी नगर येथे राहणारे लक्ष्मीदास भरतदास वैष्णव (वय ३५) यांनी ९ मार्च रोजी सायंकाळी घराला कुलूप लावून कुटुंबासह विजय नगर, कळमणा मार्केट परिसरातील नातेवाईकांकडे गेले होते. याच काळात ९ ते १० मार्चच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घरातील आलमारीत ठेवलेली १२ हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने तसेच होंडा अ‍ॅक्टिव्हा (एमएच ४९ एडी १४५४) अशी सुमारे ७ लाख ८३ हजार रुपयांची मालमत्ता चोरट्यांनी लंपास केली. या घटनेप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.

दरम्यान, गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हेशाखा युनिट क्र. ५ च्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने गस्त घालताना संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. ते होंडा अ‍ॅक्टिव्हा (एमएच ४९ एडी १४५४) आणि सुझुकी अ‍ॅक्सेस (एमएच ४९ बीजी ९३९८) या दुचाकींवर फिरताना आढळले.

त्यांच्या झडतीत पिवळ्या व पांढऱ्या धातूचे दागिने तसेच एक मोबाईल फोन आढळून आला. सुरुवातीला त्यांनी चौकशीदरम्यान टाळाटाळ केली; मात्र सखोल चौकशीत त्यांनी हुडकेश्वर परिसरातील घरफोडी आणि अ‍ॅक्सेस दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईदरम्यान आरोपींकडून ७८.०८ ग्रॅम सोन्याचे दागिने, १४४.४३ ग्रॅम चांदीचे दागिने, दोन मोपेड दुचाकी आणि एक मोबाईल फोन असा एकूण ७ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना पुढील कारवाईसाठी मुद्देमालासह हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कदम तसेच गुन्हेशाखा युनिट क्र. ५ मधील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.