भाजपला मोठा धक्का; तीन वेळा आमदार राहिलेल्या ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा

    14-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

भुवनेश्वर : राज्यात निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर आणि राजीनाम्यांची मालिकाही सुरू झाली आहे. अशातच भाजपला मोठा धक्का बसला असून तीन वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते जीवन प्रदीप दैश यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

चार दिवसांपूर्वी एका आर्थिक घोटाळ्यात आरोपी असलेल्या माजी खासदार रवींद्र कुमार यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. या निर्णयाला दैश यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांच्या आक्षेपाची दखल न घेतल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत पत्रकार परिषदेत राजीनाम्याची घोषणा केली.

पत्रकार परिषदेत बोलताना दैश यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “ओडिशामध्ये २०२४ मध्ये सत्तेत आलेल्या भाजपमध्ये आता नैतिकता उरलेली नाही. केंद्रीय तपास संस्थांच्या चौकशीत अडकलेला आणि जामिनावर बाहेर आलेला माजी खासदार पक्षात घेतला जात असेल, तर पक्ष आपल्या मूलभूत मूल्यांपासून दूर गेला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी राज्य नेतृत्वावरही निशाणा साधला. चिटफंड घोटाळ्यात आरोपी असलेल्या व्यक्तीला पक्षात प्रवेश देऊन भाजपने नीतीमत्ता गमावली असल्याचा आरोप त्यांनी केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जीवन दैश हे भारतीय वायु सेनेचे माजी सैनिक आहेत. २००० साली त्यांनी भाजपच्या तिकीटावर प्रथम आमदार म्हणून विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी बीजेडीमध्ये प्रवेश केला आणि २००९ व २०१४ मध्येही ते आमदार म्हणून निवडून आले. मात्र २०२० मध्ये काही कारणांमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे ओडिशाच्या राजकारणात नवा राजकीय समीकरणांचा अंदाज वर्तवला जात आहे.