प्रेयसीला भेटण्यासाठी बनावट पासपोर्टचा वापर; बांगलादेशी नागरिक मुंबई विमानतळावर जेरबंद

    14-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अटक केली. मार्डी लिटन (वय ३८) असे संशयिताचे नाव असून त्याने भारतात आपली ओळख लपवण्यासाठी नाव बदलून ‘लिटन दास’ असे ठेवले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित बँकॉकमध्ये काम करणाऱ्या आपल्या बांगलादेशी प्रेयसीला भेटण्यासाठी थायलंडला जाण्याच्या तयारीत होता. मात्र विमानात बसण्यापूर्वीच इमिग्रेशन तपासणीदरम्यान त्याचा भांडाफोड झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना ११ मार्च रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली. लिटन गोव्याहून मुंबईत आला होता आणि तेथून बँकॉकला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचला होता. इमिग्रेशन काउंटरवर त्याने भारतीय पासपोर्ट सादर केल्यानंतर अधिकाऱ्यांना संगणक प्रणालीत त्यावर “DRILS STATUS” असा इशारा दिसून आला. याचा अर्थ संबंधित पासपोर्ट रद्द, जप्त, हरवलेला किंवा चोरीला गेलेला असू शकतो.

हा इशारा दिसताच कर्तव्यावर असलेले सहाय्यक इमिग्रेशन अधिकारी स्वामीनाथ दाते यांनी संशय व्यक्त केला. पासपोर्ट पश्चिम बंगालमधील सीमावर्ती भागातून जारी झाल्याचे आढळून आल्याने त्यांनी लिटनला बाजूला घेऊन अधिक चौकशी केली.

चौकशीदरम्यान अखेर लिटनने आपली खरी ओळख उघड केली. त्याने २०१८ मध्ये बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानंतर तो पश्चिम बंगालमधील शांतीपूर येथे राहू लागला आणि आपले नाव बदलून लिटन दास असे ठेवले.

लिटनने २०२२ मध्ये एका स्थानिक एजंटला सुमारे ५० हजार रुपये देऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट तयार करून घेतल्याचेही सांगितले. पासपोर्ट मिळाल्यानंतर तो गोव्यात गेला आणि तेथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करू लागला.

दरम्यान, बँकॉकला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर आल्यानंतर तपासणीदरम्यान त्याचा पासपोर्ट प्रणालीमध्ये आधीच अवैध घोषित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
सहाय्यक इमिग्रेशन अधिकारी स्वामीनाथ दाते यांच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी गुन्हा नोंदवून लिटनला अटक केली आहे. बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या एजंटचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.