Image Source:(Internet)
नागपूर :
मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावामुळे जागतिक इंटरनेट (Internet) व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समुद्राखाली टाकलेल्या फायबर-ऑप्टिक केबल्सच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने इंटरनेट सेवा आणि आंतरराष्ट्रीय डेटा ट्रान्सफरवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
जगातील बहुतेक इंटरनेट सेवा या समुद्राखालील फायबर-ऑप्टिक केबल्सच्या माध्यमातून चालतात. या केबल्समुळे जगातील विविध देश डिजिटलरित्या एकमेकांशी जोडले गेले आहेत. मात्र मध्यपूर्वेतील काही महत्त्वाच्या समुद्री मार्गांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे या जागतिक डिजिटल नेटवर्कवर धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, जगातील सुमारे ९९ टक्के आंतरराष्ट्रीय डेटा ट्रान्सफर समुद्राखालील फायबर-ऑप्टिक केबल्सद्वारेच केला जातो. भारतातून युरोपसह पाश्चिमात्य देशांकडे जाणारा मोठा इंटरनेट ट्रॅफिक मध्यपूर्वेतील समुद्री मार्गातून जात असल्याने परिस्थिती गंभीर ठरू शकते.
या नेटवर्कमध्ये SEA-ME-WE 4, I-ME-WE आणि FLAG Falcon यांसारख्या महत्त्वाच्या सबमरीन केबल सिस्टिम्सचा समावेश आहे. या केबल्स मुंबई आणि चेन्नई या शहरांना युरोप व इतर देशांशी जोडण्याचे काम करतात.
दरम्यान, मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे काही भागांमध्ये केबल्सच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. जेद्दाह परिसरात २०२५ च्या अखेरीस एका महत्त्वाच्या केबलमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले होते. त्या केबलची दुरुस्ती सुरू असतानाच त्या परिसरात वाढलेल्या मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांच्या धोक्यामुळे काम थांबवावे लागल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे दुरुस्तीचे काम आणखी उशिरा पूर्ण होण्याची शक्यता आहे. परिणामी इंटरनेट सेवा आणि आंतरराष्ट्रीय डेटा ट्रान्सफरवर परिणाम होऊ शकतो.
भारतावर संभाव्य परिणाम :
जर या समुद्राखालील केबल्समध्ये अडथळा निर्माण झाला, तर भारतातील अनेक डिजिटल सेवा प्रभावित होऊ शकतात. विशेषतः ऑनलाइन व्यवहार, शेअर बाजारातील रिअल-टाइम ट्रेडिंग सिस्टिम आणि डेटा सेंटर उद्योगावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत इंटरनेटचा वेग कमी होणे, काही आंतरराष्ट्रीय वेबसाइट्स किंवा सेवा तात्पुरत्या बंद पडणे, तसेच डेटा ट्रान्सफरमध्ये विलंब होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थितीवर आता तंत्रज्ञान क्षेत्राचेही लक्ष केंद्रित झाले आहे.