Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता राज्यात लवकरच होणाऱ्या विधान परिषद (Legislative Council) निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसली तरी राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षात संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत जोरदार चर्चा रंगू लागली असून विदर्भातून कोणाला संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १५ मे रोजी विधान परिषदेच्या नऊ जागांचा कार्यकाळ संपत आहे. या जागांमध्ये विविध पक्षांचे प्रतिनिधित्व असून सध्याच्या विधानसभा संख्याबळाचा विचार करता महायुतीला बहुतेक जागांवर विजय मिळवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर महाविकास आघाडीला मर्यादित संधी मिळू शकते. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे वर्चस्व राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे दादाराव केचे, संदीप जोशी आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपत आहे. यापैकी संदीप जोशी यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट करत सक्रिय राजकारणातूनही निवृत्ती जाहीर केली आहे. दुसरीकडे दादाराव केचे पुन्हा एकदा विधान परिषदेत जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपकडून काही नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळू शकते, असे संकेत दिले जात आहेत. विदर्भातून दोन नेत्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून नागपूरसह या भागातील काही नेत्यांची नावे पुढे येत आहेत. त्यामध्ये माजी महापौर आणि शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी, पक्षाचे वरिष्ठ नेते राजीव पोद्दार तसेच सुधाकर कोहडे यांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.
नागपूरमधील अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या यशामुळे काही नेत्यांचे राजकीय वजन वाढले आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व या कामगिरीचा विचार करून त्यांना विधान परिषदेत पाठवण्याबाबत निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, यापूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांना उमेदवारी देत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीतही पक्ष चर्चेत असलेल्या नावांपैकी कोणाला संधी देतो की पुन्हा एखादा अनपेक्षित चेहरा पुढे आणतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.