पुण्यात पेपरफुटीचा प्रकार;दहावीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच व्हायरल, चौकशीचे आदेश

    11-Mar-2026
Total Views |
 
paper leak
 Image Source:(Internet)
पुणे :
राज्यातील दहावीच्या (10th) परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला असून गणित विषयाच्या दोन्ही प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच एका टेलिग्राम गटावर प्रसारित झाल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकारामुळे परीक्षा प्रक्रियेच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण मंडळाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना ९ मार्च रोजी एका संशयास्पद टेलिग्राम दुव्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर या गटाची तपासणी करण्यात आली असता गणित विषयाच्या दोन्ही प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच त्या गटावर टाकण्यात आल्याचे उघड झाले.
 
तपासणीत असेही आढळले की ६ मार्च रोजी होणारी गणित भाग–१ ची प्रश्नपत्रिका ५ मार्चच्या रात्रीच गटावर प्रसारित करण्यात आली होती. तसेच ९ मार्च रोजी झालेल्या गणित भाग–२ च्या परीक्षेची प्रश्नपत्रिका तर तब्बल तीन दिवस आधीच त्या गटावर उपलब्ध करण्यात आली होती.
 
यानंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी टेलिग्रामवर प्रसारित झालेल्या प्रश्नपत्रिकांची अधिकृत प्रश्नपत्रिकांशी तुलना केली. या पडताळणीत दोन्ही प्रश्नपत्रिका तंतोतंत जुळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रश्नपत्रिका गळती झाल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
 
या प्रकरणी पुणे विभागीय मंडळाचे सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित टेलिग्राम गटाचे प्रशासक आणि सदस्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
 
प्रश्नपत्रिका नेमकी कुठून बाहेर पडली, त्यामागे कोणाचा सहभाग आहे आणि या प्रकरणात कोणी मोठे अधिकारी किंवा खासगी शिकवणी वर्गांचे चालक सहभागी आहेत का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे राज्यातील दहावीच्या परीक्षेच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.