कोराडी महाजेनकोत हॉट एअर पाइपलाइनला गळती; गरम वाफेच्या झळा लागून चार कर्मचारी जखमी

    11-Mar-2026
Total Views |
 
Koradi Mahagenco
 Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर जिल्ह्यातील कोराडी (Koradi) येथील महाजेनकोच्या ६६० मेगावॅट वीज प्रकल्पात बुधवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास अचानक अपघात घडला. टर्बाइन मेंटेनन्स विभागातील हॉट एअर पाइपलाइनमध्ये गळती झाल्याने तीव्र गरम वाफ बाहेर पडली आणि त्याच्या झळा लागून चार कर्मचारी जखमी झाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पाइपलाइनमधून अचानक उच्च दाबाची गरम वाफ बाहेर पडू लागल्याने त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी त्याच्या संपर्कात आले. या घटनेत त्यांच्या हात-पायांना किरकोळ भाजल्या गेल्याचे सांगितले जात आहे.
 
जखमी कर्मचाऱ्यांमध्ये रविंद्र नांदुरकर (५०), विशाल कांबळे (४०, सुपरवायझर), राहुल केळकर (३५, फिटर) आणि शैलेश मेश्राम (३५) यांचा समावेश आहे.
 
अपघात घडल्यानंतर महाजेनको प्रशासनाने तातडीने सर्व जखमींना कोराडी कॉलनीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यापैकी दोघांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले, तर उर्वरित दोन कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
 
घटनेच्या वेळी सेक्शन इंचार्ज, सुरक्षा अधिकारी तसेच इतर कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. प्रकल्पातील स्टीम आणि ऐश पाइपलाइनमध्ये अधूनमधून गळती होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या असल्याची चर्चा आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा दुर्घटना टाळण्यासाठी पाइपलाइनची नियमित तपासणी आणि देखभाल करणे अत्यावश्यक आहे.
 
दरम्यान, या घटनेची चौकशी महाजेनको प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मुख्य अभियंता विलास मोटघरे यांनी जखमी कर्मचाऱ्यांच्या उपचारांना प्राधान्य देण्यास सांगत आवश्यक ती सर्व मदत देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.