गॅस टंचाईचा रेल्वे केटरिंगवर परिणाम; ट्रेनमधील शिजवलेले जेवण तात्पुरते बंद होणार?

    11-Mar-2026
Total Views |
- स्टेशनवरील स्टॉल्सना इंडक्शन आणि मायक्रोवेव्हचा पर्याय

Gas shortageImage Source:(Internet) 
नागपूर :
देशात निर्माण झालेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईचे (Gas shortage) पडसाद आता रेल्वे व्यवस्थेतही उमटू लागले आहेत. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-अमेरिका आणि इस्रायलमधील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून एलपीजीच्या पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम होत आहे. परिणामी अनेक भागांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.
 
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५ मार्च रोजी अधिसूचना काढून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीवर काही निर्बंध लागू केले आहेत. सिलिंडर उपलब्धतेत होत असलेल्या विलंबामुळे काही शहरांमध्ये नागरिकांना गॅस एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र दिसत आहे. या परिस्थितीचा फटका रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स आणि केटरिंग सेवा देणाऱ्या व्यावसायिकांनाही बसू लागला आहे.
 
एलपीजीची संभाव्य कमतरता लक्षात घेऊन Indian Railway Catering and Tourism Corporation ने रेल्वे स्थानकांवरील केटरिंग युनिट्ससाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. गॅसवर अवलंबित्व कमी करण्यासाठी स्टॉल चालकांना इंडक्शन कुकटॉप आणि मायक्रोवेव्हसारख्या विद्युत उपकरणांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच प्रवाशांना सेवा देताना अडचण निर्माण होऊ नये म्हणून रेडी-टू-ईट खाद्यपदार्थांचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
 
हे निर्देश रेल्वे स्थानकांवरील फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम आणि ‘जन आहार’ आऊटलेट्ससाठी लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गॅसची उपलब्धता कमी झाल्यास स्टॉल चालकांना त्यांच्या कामकाजात आवश्यक बदल करावे लागतील आणि पर्यायी व्यवस्था केल्याची माहिती संबंधित विभागाला देणे बंधनकारक राहणार आहे.
 
दरम्यान, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांसाठी जेवण स्टेशनवरील बेस किचनमध्ये तयार केले जाते. मात्र तेथे एलपीजीचा पुरवठा कमी झाल्यास गाड्यांसाठी अन्न तयार करण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे काही गाड्यांमध्ये शिजवलेल्या जेवणाची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा पर्याय रेल्वे प्रशासन विचारात घेत असल्याची माहिती मिळत आहे. तिकीट आरक्षण करताना आधीच जेवणासाठी पैसे भरलेल्या प्रवाशांना आवश्यक असल्यास परतावा देण्याची प्रक्रियाही सुरू करण्याची तयारी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.