नागपुरात गॅस सिलिंडरची साठेबाजी किंवा काळाबाजार केल्यास थेट गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

    11-Mar-2026
Total Views |
 
Dr Vipin Itankar
 Image Source:(Internet)
नागपूर :
गॅस सिलिंडरचा अवैध साठा करणे किंवा काळ्या बाजारात विक्री करणे आढळल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूरचे जिल्हाधिकारी (Collector) तथा मनपा आयुक्त डॉ. विपीन ईटनकर यांनी दिला आहे. नागरिकांनी भीतीपोटी गॅस सिलिंडर साठवून ठेवू नये, कारण शहरात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या संयुक्त बैठकीनंतर नागपूर शहर व जिल्ह्यात विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांकडून गॅस एजन्सी, गोडाऊन आणि संशयित ठिकाणी धाडसत्र राबवले जाणार असून साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी कडक तपासणी केली जाणार आहे.
 
अन्न व नागरी पुरवठा विभागाची छापेमारी-
गॅस सिलिंडरच्या अनधिकृत साठ्याला आळा घालण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने नागपूरमध्ये छापेमारी मोहीम सुरू केली आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई करत एजन्सी आणि गोदामांची तपासणी केली जात आहे.
पुरवठा विभागाचे परिमंडळ अधिकारी विनोद वाघदे आणि सागर बावरे यांनी सांगितले की, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने काही ठिकाणी काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारात सहभागी आढळणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल.
 
घरगुती गॅसचा पुरेसा साठा-
जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. दररोज सुमारे २० हजार १३० गॅस सिलिंडरची विक्री होत असून शहरात अनेक गॅस एजन्सी कार्यरत आहेत. सध्या दोन दिवसांचा सिलिंडर साठा उपलब्ध असून विविध कंपन्यांकडे पाच ते सहा दिवसांचा स्टॉक आहे.
 
एचपीसीएलच्या रिप्लिंग प्लांटमध्ये दररोज सुमारे १५० टन घरगुती गॅस उपलब्ध होत असल्याने पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक डेपोमधूनही गॅसचा नियमित पुरवठा होत असल्याने नागरिकांनी घाबरून सिलिंडरचा साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन-
गॅसची बुकिंग आवश्यकतेनुसारच करावी आणि अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी २५ दिवसांनंतरच बुकिंग करावी, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
 
दरम्यान, कुठे गॅसचा अवैध साठा किंवा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तक्रार करावी. अशा प्रकरणांवर त्वरित कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
 
विशेष पथकाची नजर-
जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली असून गॅस एजन्सींची तपासणी केली जात आहे. काही ठिकाणी घरगुती गॅसचा वापर हॉटेल किंवा व्यावसायिक कारणांसाठी होत असल्यास त्यावरही कारवाई केली जाणार आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे इंधनाबाबत चिंता व्यक्त होत असली तरी नागपूर जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.