सोशल मीडिया रील स्टार अरुण तुपे यांचे निधन; राहत्या घरी मृतावस्थेत सापडल्याने खळबळ

    10-Mar-2026
Total Views |
 
Arun Tupe
 Image Source:(Internet)
छत्रपती संभाजीनगर :
सोशल मीडियावर (Social media) रील्समुळे लोकप्रिय ठरलेले तरुण कलाकार अरुण तुपे यांचे मंगळवारी (10 मार्च) सकाळी निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील बालाजी नगर येथील त्यांच्या राहत्या घरात ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
 
अरुण तुपे हे इन्स्टाग्रामवर ‘कोण अरुण तुपे’ या नावाने अकाऊंट चालवत होते. त्यांच्या मजेशीर आणि अभिनयप्रधान रील्समुळे ते तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते. इन्स्टाग्रामवर त्यांचे सुमारे १.७९ लाख फॉलोअर्स असून त्यांच्या व्हिडिओंना मोठा प्रतिसाद मिळत होता. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
माहितीनुसार, अरुण तुपे हे घरी गंभीर अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपासासाठी अरुण तुपे यांचा मृतदेह घाटी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.