Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाचा परिणाम आता जागतिक तेल (Oil) बाजारावर दिसू लागला आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील संघर्ष तीव्र होत असताना कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी चढ-उतार सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या तेल आयातीवर अवलंबून असलेल्या देशांची चिंता वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले होते. एका टप्प्यावर प्रति पिंप ११५ डॉलरपर्यंत गेलेले दर सध्या सुमारे ८५ डॉलरच्या आसपास आहेत. मात्र तणाव कायम राहिल्यास भविष्यात दर १५० ते २०० डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ९० टक्के कच्चे तेल परदेशातून आयात करतो. यापैकी जवळपास निम्मा पुरवठा आखाती देशांकडून होतो. त्यामुळे त्या भागातील कोणताही संघर्ष भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरतो.
भारताकडे सध्या अंदाजे २५० दशलक्ष बॅरल कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचा राखीव साठा आहे. लिटरमध्ये मोजल्यास हा साठा सुमारे ४००० कोटी लिटर इतका आहे. हा साठा देशाच्या गरजेनुसार साधारण सात ते आठ आठवडे पुरेल, असे मानले जाते.
गेल्या दशकात भारताने तेल आयातीचे स्रोत वाढवले आहेत. पूर्वी सुमारे २७ देशांकडून तेल खरेदी केले जात होते, तर आता जवळपास ४० देशांकडून कच्चे तेल आयात केले जाते. रशिया, अमेरिका, पश्चिम आफ्रिका आणि मध्य आशियातील काही देशांकडूनही भारत मोठ्या प्रमाणावर तेल घेत आहे.
जगातील सुमारे २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होर्मुझ सामुद्रधुनीतून होते. भारताचे सुमारे ४० टक्के तेल या मार्गाने येते. त्यामुळे या समुद्री मार्गावरील तणाव वाढल्यास जागतिक पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
कच्चे तेल हे केवळ इंधनापुरते मर्यादित नसून सुमारे सहा हजार वस्तू तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो. पेट्रोल, डिझेल, विमान इंधन, द्रवित वायू, रॉकेल यांसारख्या इंधनांबरोबरच प्लास्टिक, कृत्रिम धागे, औषधोपचारासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू तसेच सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठीही कच्च्या तेलाचा वापर होतो.
म्हणूनच कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली तर त्याचा परिणाम अनेक वस्तूंच्या किमतींवर होऊन महागाई वाढण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील संघर्ष लांबला तर त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर होऊ शकतो.