नागपुरात एलपीजी गॅसची कमतरता; हॉटेल व्यवसायिकांकडून घरगुती सिलिंडरचा वापर वाढला !

    10-Mar-2026
Total Views |
 
LPG gas
 Image Source:(Internet)
नागपूर :
शहरात सध्या घरगुती एलपीजी गॅस (LPG gas) मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. या तुटवड्यामागे लहान हॉटेल, टपऱ्या आणि खानावळींमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडरचा होत असलेला वापर हे प्रमुख कारण असल्याची चर्चा सुरू आहे. नियमानुसार व्यावसायिक वापरासाठी वेगळे व्यावसायिक सिलिंडर वापरणे आवश्यक असताना अनेक ठिकाणी स्वस्त दरामुळे घरगुती गॅसच वापरला जात असल्याचे आढळून येत आहे.
 
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण–इजरायल संघर्षाचा अप्रत्यक्ष परिणामही पुरवठ्यावर होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरातील गॅस उपलब्धतेवर काही प्रमाणात दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे.
 
शहरातील अनेक गॅस एजन्सीसमोर सकाळपासूनच ग्राहकांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. काही भागांत नागरिकांना वेळेवर सिलिंडर न मिळाल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
 
गॅस वितरकांच्या म्हणण्यानुसार, घरगुती गॅसचा पुरवठा ठरावीक मर्यादेत केला जातो. मात्र तोच गॅस हॉटेल व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या केंद्रांमध्ये वापरला गेल्याने सामान्य ग्राहकांसाठी उपलब्धता कमी पडते.
 
या परिस्थितीत घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर थांबवण्यासाठी प्रशासनाने कठोर तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अचानक तपासण्या आणि कारवाई केल्यास हा गैरप्रकार कमी होऊ शकतो, असेही मत व्यक्त केले जात आहे.