इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीत मोठी घसरण; खरेदीची ही योग्य वेळ का?

    10-Mar-2026
Total Views |
 
Gold
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या तणाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत मोठी उलथापालथ सुरू आहे. अशा काळात सामान्यतः सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोने (Gold)-चांदीच्या किमती वाढतात; मात्र यावेळी उलट चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव सुमारे ८ हजार रुपयांनी तर चांदीचा भाव तब्बल २८ हजार रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे सध्या सोने-चांदी खरेदी करावी की अजून प्रतीक्षा करावी, असा प्रश्न गुंतवणूकदार आणि ग्राहकांना पडला आहे.
 
१० मार्च रोजी जाहीर झालेल्या दरांनुसार २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,५८,६७० रुपयांवर आली आहे. त्याचवेळी २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४५,३५० रुपये झाला आहे. १८ कॅरेट सोन्याचा दरही घसरून १,१९,०१० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आला आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसून आली असून सध्या चांदीचा दर सुमारे २,६२,८०३ रुपये प्रति किलोच्या आसपास आहे.
 
युद्धापूर्वी सोन्याचा दर १.६६ लाखांच्या वर
मिडल ईस्टमधील युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याचा दर सुमारे १,६६,४६९ रुपये प्रति १० ग्रॅम होता. युद्धानंतर त्यामध्ये घट होऊन तो १,५८,६७० रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे चांदीचा दर २,८९,९३६ रुपये प्रति किलोवरून घसरून २,६२,८०३ रुपयांवर आला आहे. म्हणजेच युद्धानंतर सोन्याचा भाव सुमारे ८ हजार रुपयांनी आणि चांदीचा भाव सुमारे २८ हजार रुपयांनी कमी झाला आहे.
 
यापूर्वी गाठला होता विक्रमी उच्चांक
यापूर्वी २९ जानेवारी रोजी सोने-चांदीने विक्रमी उच्चांक गाठला होता. त्या वेळी सोन्याचा दर जवळपास १.९२ लाख रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचला होता, तर चांदीचा दर सुमारे ४.२० लाख रुपये प्रति किलोपर्यंत गेला होता. त्या तुलनेत सध्याचे दर लक्षणीयरीत्या खाली आले आहेत.
 
घसरणीमागे अनेक कारणे
बाजारातील तज्ज्ञांच्या मते या घसरणीमागे अनेक आर्थिक कारणे आहेत. अनेक गुंतवणूकदार सध्या नफा वसुली करत आहेत. काही गुंतवणूकदारांनी सोने विकून शेअर बाजारातील तोटा भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाईचा दबाव वाढत आहे. त्यामुळे अनेक केंद्रीय बँका व्याजदर कमी करण्याऐवजी वाढवण्याचा विचार करत आहेत. व्याजदर वाढल्यास सोन्यावर दबाव येतो.
 
डॉलर मजबूत झाल्याचा परिणाम
अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्यानेही सोन्याच्या किमतीवर दबाव आला आहे. काही केंद्रीय बँकांनी सोने खरेदी कमी केल्यामुळे मागणी घटली असून त्यामुळेही दर खाली आले आहेत. तज्ज्ञांच्या मते मिडल ईस्टमधील परिस्थिती स्थिर होईपर्यंत सोने-चांदीच्या किमतीत आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने अजूनही सुरक्षित पर्याय मानला जातो.
 
आजचे प्रमुख शहरांतील दर
१० मार्च २०२६ रोजी देशातील प्रमुख शहरांमधील अंदाजे दर पुढीलप्रमाणे आहेत (ज्वेलर्सनुसार दर बदलू शकतात) :
मुंबई – २४ कॅरेट सोने ₹१,६१,६७० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोने ₹१,४८,१९०; चांदी ₹२,७९,९०० प्रति किलो
दिल्ली – २४ कॅरेट सोने ₹१,६१,९३० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोने ₹१,४८,४५०; चांदी ₹२,८०,००० प्रति किलो
चेन्नई – २४ कॅरेट सोने ₹१,६२,४४० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोने ₹१,४८,९००; चांदी ₹२,८१,००० प्रति किलो
कोलकाता – २४ कॅरेट सोने ₹१,६१,७८० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोने ₹१,४८,३००; चांदी ₹२,८०,००० प्रति किलो
बेंगळुरू – २४ कॅरेट सोने ₹१,६१,७८० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोने ₹१,४८,३००; चांदी ₹२,८०,००० प्रति किलो
हैदराबाद – २४ कॅरेट सोने ₹१,६१,७८० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोने ₹१,४८,३००; चांदी ₹२,८०,००० प्रति किलो
पुणे – २४ कॅरेट सोने ₹१,६१,७८० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोने ₹१,४८,३००; चांदी ₹२,७९,९०० प्रति किलो