नागपुरातील वेडा हरी परिसरातील प्लास्टिकच्या गोदामाला आग, फायटर विमान कोसळल्याची अफवा!

    10-Mar-2026
Total Views |
 
Fire breaks
 Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील वेडा हरी परिसरात खरसोली मार्गावर, जबलपूर महामार्गाजवळ असलेल्या प्लास्टिकच्या गोदामाला मंगळवारी दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, घटनास्थळाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाला असून त्यात फायटर विमान कोसळल्याचा दावा केला जात आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने ही माहिती पूर्णपणे अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोल्ड कॉईन हॉटेलच्या शेजारी असलेल्या प्लास्टिक साहित्याच्या गोदामाजवळ ही आग लागली. हॉटेलमधील काही महिला कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा जाळल्याची माहिती समोर आली आहे. त्यातून उडालेल्या ठिणग्या जवळील प्लास्टिकच्या गोदामात पडल्याने आग वेगाने पसरली, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य साठवलेले असल्यामुळे काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. आकाशात काळ्या धुराचे मोठे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. मात्र गोदामातील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.