Image Source:(Internet)
चंद्रपूर :
चंद्रपूर महानगरपालिकेच्या (Chandrapur Municipal Corporation) स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित झाली असून १६ मार्च रोजी नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
निवडणूक प्रक्रियेअंतर्गत ११ व १२ मार्च रोजी उमेदवारी अर्ज घेता येणार असून १३ मार्च रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
स्थायी समितीत एकूण १६ सदस्य आहेत. त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे ६, काँग्रेसचे ७, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे २ आणि जनविकास सेनेचा १ सदस्य आहे.
संख्याबळ पाहता भाजप-शिवसेना गटाकडे ८ सदस्य आहेत, तर काँग्रेस व त्यांच्या सहकाऱ्यांकडेही ८ सदस्य आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बरोबरीची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निकाल निर्णायक मताने लागणार की चिठ्ठीद्वारे ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच काँग्रेस, भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांसह प्रमुख पक्षांनी अध्यक्षपद मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाल वाढल्याचे दिसून येत आहे.