Image Source:(Internet)
पुणे:
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना खोकल्याच्या त्रासामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालय प्रशासनाशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी उपचारांबाबत संपूर्ण निर्णय डॉक्टरांवर सोपवत पूर्ण सहकार्याची भूमिका स्पष्ट केली.
“डॉक्टर, तुम्ही जसं सांगाल तसंच आम्ही सगळे वागू. तुमचं सल्ला आमच्यासाठी अंतिम असेल,” असे ठाम शब्दांत सांगत सुप्रिया सुळेंनी केवळ कुटुंबीय म्हणूनच नव्हे, तर जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणूनही वैद्यकीय पथकावर पूर्ण विश्वास व्यक्त केला.
माध्यमांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेता, त्यांनी रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या की, पुढील १० मिनिटांत डॉक्टरांनी स्वतः माध्यमांसमोर अधिकृत वैद्यकीय माहिती द्यावी. तसेच, कोणत्याही व्हिजिटर्सना रुग्णालयात प्रवेश देऊ नये आणि हॉस्पिटलचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, रुबी हॉल क्लिनिकच्या बाहेर शरद पवार समर्थक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनंतर पोलिस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला असून, अनावश्यक प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. लवकरच डॉक्टरांकडून अधिकृत वैद्यकीय बुलेटिन जाहीर केले जाणार आहे.