शरद पवार यांची तब्येत खालावली; पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवण्याचा निर्णय

    09-Feb-2026
Total Views |
 
Sharad Pawar
 Image Source:(Internet)
बारामती:
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली असून, पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठणठणीत नसल्याचे सांगितले जात होते, मात्र आज सकाळपासून त्रास वाढल्याने डॉक्टरांनी अधिक तपासणीचा सल्ला दिला आहे.
 
सध्या शरद पवार हे बारामतीतील गोविंदबाग येथील निवासस्थानी असून, आज सकाळी ताप, खोकला आणि कफचा त्रास जाणवत असल्याने डॉक्टरांचे पथक त्यांच्या घरी दाखल झाले होते. प्राथमिक तपासणीनंतर औषधोपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सुमारास डॉक्टरांच्या दुसऱ्या पथकानेही त्यांची पुन्हा तपासणी केली.
 
या तपासणीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवून असून, आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 
दरम्यान, आज बारामतीतील काठेवाडी येथे पार पडणाऱ्या अजित पवार यांच्या तेराव्याच्या विधीस शरद पवार उपस्थित राहणार होते. मात्र तब्येत बिघडल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.
 
सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी उपचार सुरू असून, पुण्यात दाखल केल्यानंतर अधिक तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत पुढील माहिती अधिकृतपणे देण्यात येईल, असेही कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.