Image Source:(Internet)
मुंबई:
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल समोर येऊ लागले असून, राज्यात अनेक ठिकाणी महायुतीला आघाडी मिळत असल्याचे चित्र आहे. या निकालांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी व्यक्त केले.
निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारने राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करत योजना आखल्या असून, त्याचा थेट परिणाम निवडणूक निकालांतून दिसून येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेली विकासकामे आणि प्रशासनातील स्थैर्य यामुळे जनतेचा सरकारवरील विश्वास अधिक बळकट झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. महायुतीतील तिन्ही प्रमुख नेत्यांनी एकत्रितपणे काम केल्याने संघटनेला यश मिळाले, असे चव्हाण यांनी नमूद केले.
“देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महायुती म्हणून समन्वय साधत काम केले. त्याचा फायदा थेट निवडणूक निकालांतून दिसून येत आहे,” असे ते म्हणाले.रवींद्र चव्हाण यांनी पुढे सांगितले की, १२ जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा विश्वास असून, हे यश जनतेच्या पाठिंब्याचे प्रतीक असल्याचा दावाही त्यांनी केला.