उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा

    09-Feb-2026
Total Views |
 
PM Narendra Modi
 Image Source:(Internet)
मुंबई:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आज, ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा होत आहे. ९ फेब्रुवारी १९६४ रोजी जन्मलेल्या एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले शिंदे हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.
 
संघटनात्मक बांधणी, सामान्य कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि ‘ग्राउंड लेव्हल’वर काम करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी घेतलेले अनेक निर्णय चर्चेत राहिले असून, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे नेणारा नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांच्या जनसेवेचे आणि विकासाभिमुख कार्याचे कौतुक केले.
 
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते अथक परिश्रम करत आहेत. त्यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो.”
 
पंतप्रधानांकडून मिळालेल्या शुभेच्छांबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी उत्तरादाखल म्हटले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद. तुमचे प्रेमळ शब्द आणि आशीर्वाद प्रेरणादायी आहेत. तुमच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत असून, महाराष्ट्रातही विकासाच्या त्या मार्गावर आम्ही पूर्ण वचनबद्धतेने पुढे जात आहोत.”
 
एकूणच, राज्यभरातून आणि देशभरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, राजकीय, सामाजिक आणि पक्षीय स्तरावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.