Image Source:(Internet)
मुंबई:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय व्याख्यानमालेवर बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संघप्रमुख मोहन भागवत यांच्या व्याख्यानाचे कौतुक करत त्यांनी ते प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.
करण जोहर यांनी सांगितले की, RSS च्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोहन भागवत यांचे विचार अत्यंत लक्षपूर्वक ऐकले. त्यांचे भाषण विचारप्रवर्तक तर होतेच, पण त्यात सूक्ष्म आणि प्रभावी विनोदाची झलकही पाहायला मिळाली, असे त्यांनी नमूद केले.
RSS च्या शंभर वर्षांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देताना करण जोहर म्हणाले की, अशा प्रकारचे कार्यक्रम समाजात विचारमंथन आणि संवादासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतात. मोहन भागवत यांच्या विचारांमध्ये सखोलता असून सकारात्मक दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो, असेही त्यांनी सांगितले.
RSS च्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ही व्याख्यानमाला संघाची शंभर वर्षांची वाटचाल, सामाजिक योगदान आणि भविष्यातील दिशा यावर केंद्रित असून, या कार्यक्रमात देशातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती सहभागी होत आहेत.