अजित पवारांच्या अपघाताचे भांडवल करू नका; शहाजी बापू पाटील यांचा इशारा

    07-Feb-2026
Total Views |
 
Shahaji Bapu Patil
 Image Source:(Internet)
सांगोला :
अजित पवारांच्या (Ajit Pawar) विमान अपघाताबाबत सोशल मीडियावर आणि काही व्यक्तींकडून केले जात असलेल्या भडक वक्तव्यांवर आमदार शहाजी बापू पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “फुकट प्रसिद्धीसाठी अशा संवेदनशील विषयांवर बेताल बोलण्याचा उद्योग अलीकडे सुरू झाला आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
 
“अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता,” असा दावा करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना शहाजी बापू म्हणाले की, हा तांत्रिक स्वरूपाचा निव्वळ अपघात असल्याचे प्राथमिक पातळीवर स्पष्ट होत आहे. “विमानात तांत्रिक बिघाड होता की वैमानिकाची चूक हे तपासातून समोर येईल. मात्र, विनाकारण अफवा पसरवून लोकांच्या भावना चाळवू नयेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
 
आज सांगोला तालुक्यातील चीक महूद येथे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शहाजी बापू पाटील यांनी देशाचे माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या भूमिकेचाही उल्लेख केला. “जगातील उत्तम विमाने पाहिलेला अनुभव असलेल्या शरद पवार साहेबांनीही हा निव्वळ अपघात असल्याचे स्पष्ट केले आहे,” असे ते म्हणाले.
 
“कृपा करून अजित दादांच्या अपघाताबाबत कोणतीही अफवा पसरवू नका किंवा राजकीय भांडवल करू नका,” असे आवाहन करत शहाजी बापू पाटील यांनी अशा वक्तव्यांमुळे समाजात गैरसमज आणि अस्थिरता निर्माण होते, असेही नमूद केले.